शेतकरी राजा, कर्जमाफी, कांदा-टोमॅटो आणि बरंच काही

हे बघा, मी पण एक शेतकरी आहे. उघडपणे मत मांडले की लोक जीव घेई पर्यंत मजल मारतात. म्हणून इथे लिहितोय.

शेतकरी राजा आणि त्याची संकटे

भारतात “शेतकरी” हा खऱ्या अर्थाने राजा व्हायला पाहिजे होता. राजा आहेच असे म्हणायला हरकत नाही. पण वेळो वेळी होणारे नैसर्गिक नुकसान, बाजार भाव अश्या कित्येक गोष्टीमुळे आजही शेतकरी मागे आहे. शेती करतो असे बोलल्यावर कोणी लग्नासाठी मुलगी सुद्धा देत नाही. दुसरा नोकरदार किंवा धंदेवाईक सोडा, स्वतः शेतकरी सुद्धा आपली मुलगी दुसऱ्या शेतकऱ्याला देत नाही. किंवा बाप – भाऊ शेतकरी असून सुद्धा मुली इंजिनीअर मुलाची अपेक्षा करतात.

पिकलेल्या (सडाऊ) मालाला बाजारात भाव मिळत नाही म्हणून शेतकरी माल फेकून देताना चे विडिओ आपण आता बघतो. हे शेती माल फेकणारे विडिओ सहसा पुणे, मुंबई सारख्या बाजारात मंडईत भाव मिळत नाही म्हणून चे असतात. इतकी संकटे झेलून पिकवलेला माल फेकून का देतात? जो भाव मिळतोय त्यात विकून का टाकत नाहीत?

ब्रँड इज ब्रँड

इंस्टाग्राम वर आजकाल शेतकऱ्यांच्या मुलांनी धुमाकूळ घातलाय. यांचा प्रत्येक विडिओ शेतकरी राजा, शेतकरी ब्रँड असे असतात. तुम्हाला सांगतो, कुठलीही मोठी गोष्ट जर नम्रतेने न सांगता माजुर्डे पणाने सांगितली की तिला विरोध होतोच. शेतकरी इतकाच ब्रँड आहे तर मग दरवर्षी कर्ज का घेतो? बरं घेतो तर घेतो, त्याचे व्याज तर सोडा, सबसिडी पण सोडा, साधी मुद्दल द्यायला नको म्हणतो. कर्जमाफी साठी उपोषण करतो. तेव्हा कुठे जातो ब्रँड?

इंस्टाग्राम वर विडिओ टाकताना शेतकऱ्यांची मुले डायलॉग टाकतात. “माझ्याकडे १५ एकर शेती आहे, घे मुतलो तुझ्या १५००० च्या नोकरी वर” किंवा पोरींना उद्देशून विडिओ असतो की ती तिला घ्यायला येणाऱ्या आयटी कंपनीच्या कॅब वर उडते, आमच्या कडे ४ टॅक्टर, ३ सुमो आहेत. वैगरे वैगरे. मग तुमचा बाप जेव्हा कर्जमाफी साठी उपाशी बसलेला असतो, तेव्हा कुठे जातो तुमचा माज? तेव्हा कुठे जातो तुमचा ब्रँड?

ज्या १५००० वाल्या पोरीचा माज तुम्ही काढत होता ना, तिचा सुद्धा थोडा ना थोडा पैसा तुमच्या कर्जमाफी च्या पैश्यात लागलेला असतो.

शहरात राहून आयटी कंपनीत किंवा कोणत्याही कंपनीत काम करणारा छोट्या हुन छोट्या माणसाच्या पगारातून इनकम टॅक्स कापला जातो. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही पण टॅक्स देता. हो देता ना, देशातला प्रत्येक नागरिक GST, पेट्रोल डिझेल वरचा टॅक्स देतोच. मग हा टॅक्स तर कंपनीत काम करणारा माणूस पण देतोयेच ना. ते सोडून अजून त्याच्या कडून इनकम टॅक्स घेतात, म्हणून टॅक्स भरतो असे बोलतोय.

एकदा सरकारी योजना ज्या असतात त्यांची पाने चाळून बघा. कित्येक सरकारी योजनांचा लाभ एक टॅक्सपेयर घेऊ शकत नाही. आज कोरोना पासून जे फुकट रेशन तुम्हाला मिळते, त्यातून टॅक्सपेयर ला वगळण्यात आले आहे. म्हणजे जे कमावत आहेत. ते गुन्हा करत आहेत. आणि जे कमी कमावतात किंवा रिकामचोट आहेत, सरकार त्यांना घरी बसून पोसत आहे.

कर्ज आणि त्याचा परतावा

शहरी पगारी माणूस कर्ज घेऊन फ्लॅट, कार घेतो. त्याचे कर्ज तो फेडतो. फ्लॅट चे हफ्ते थकले तर बँक तो फ्लॅट विक्री काढते. कार चे हफ्ते थकले की फिनान्स वाले कार उचलून नेतात. पण म्हणून काय तो उपोषणाला बसत नाही. याउलट तुमचे काही झाले की लगेच विडिओ येतात. शेतकऱ्यावर जुलूम सुरुये वैगरे मथड्याखाली बातम्या येतात. दरवर्षी कर्जमाफी मागितली जाते.

हजारो वर्षांपासून शेतकरी शेती करतोय, पण या अश्या नैसर्गिक आपत्ती पासून कसे वाचावे याची काही तयारी शेतकऱ्याने केलीच नाही. शेतकरी फक्त आपल्या मुलामुलींची हाथ पिवळी करण्यात आणि शेजाऱ्याचे बांध कोरण्यात मश्गुल राहिला.

शेती मालाचा भाव, नासाडी

शेती मालाला भाव कमी मिळाला म्हणून शेतकरी माल फेकून देतो. पण तोच भाव वाढला की एकदम सडलेला माल सुद्धा विकायला घेऊन येतो. दरवेळी एकच ओरड असते. तुम्ही हॉटेलात जाऊन तिथले २० रुप्याचे मिनरल पाणी पितात आणि शेतकऱ्याच्या मालाचा भाव करतात. अरे कितीही ठरवले तरी कोणताही नोकरदार माणूस रोज पाणी विकत घेऊन पीत नाही. रोज रोज पिझ्झा बर्गर खात नाही. त्यालाही रोज चपाती भाजी खायची असते जशी तुम्ही खाता.

मालाला भाव नाही म्हणून तुमची जशी ओरड असते, तशी टोमॅटो खूप महाग झाला अशी ओरड नोकरदार माणूस का करू शकत नाही? आज पुणे, मुंबई मध्ये टोमॅटो १०० रुपये किलो आहे. कांदा ५० रुपये किलो आहे. जेव्हा टोमॅटो फेकून देणारे विडिओ येतात, तेव्हा सुद्धा टोमॅटो कमीत कमी ३०-४० रुपये किलोच असतो. तुमचा पैसा सामान्य माणूस, जो शेवटचा लाभार्थी आहे, तो खात नाही. म्हणून बिसलेरी चे उदाहरण देणे थांबवा.

ऊसाला भाव मागणारा शेतकरी मात्र साखर घेताना खिसा चाचपतो. तीच गत कापूस पिकवणाऱ्याची पण असते. कच्चा माल महागला तर पक्का महाग नाही का होणार? रोज लागणाऱ्या वस्तू जसे की भाजीपाला आणि धान्य हे महाग आहे, पण ते तुमच्याकडे पिकते म्हणून त्याची तुम्हाला रोज झळ बसत नाही. पण ती झळ सामान्य माणसाला मात्र बसते.

वर्षभरातून २ जीन्स २ शर्ट घेतल्या त्याचे ३००० झाले. रोज २० रुपयाचा भाजीपाला (२० x ३६५ = ७३००) याची तुलना तरी कशी होऊ शकते? बरं यात फक्त भाजीपाल्याचे पैसे धरले आहेत (मसाला, कांदा, लसूण, पीठ) असे सगळे. त्यात इतर गोष्टी गॅस वैगरे तर धरले पण नाही.

Leave a comment