कसलीशी अमावस्या होती. सकाळीच आपल्या दुचाकीवर टांग टाकून मी चहा प्यायला निघालो. सकाळचे साडे सहा, पाऊणे सात झाले असावेत. चौकातल्या चहा टपरीवर गेलेलो. अजून चहा व्हायचा होता म्हणून सहज फूटपाथ वरून थोडं चालून यावं म्हणून पायी निघालो.
फूटपाथ वर मधेच एकाने तंबूवजा झोपडी उभारली होती. झोपडीत एक चिमुरडी पहुडलेली होती. बाप बाहेर डोक्याला एक हात लावून दुसऱ्या हाताने चुलीतल्या राखेने दात घासत होता. त्यांच्या कडे एक त्रासिक कटाक्ष टाकून मी पुढे निघालो, कारण त्यांनी फूटपाथ वर बस्तान बसवले होते. त्यांच्यामुळे मला फूटपाथ उतरून पुढे जावे लागणार होते. त्यांना ओलांडून पुढे पुन्हा फूटपाथ वर चढणार तोच तिथले दृश्य बघून मी थबकलो.
फूटपाथ लगत लावलेल्या पिंपळाच्या झाडाखाली एका कागदात हळद गुलाल वाहून काळी डाळ आणि एक टोचलेले लिंबू मला दिसले. आतून मी कितीही विज्ञानाचा चोदा असलो तरी मला पुढे जायची हिम्मत झाली नाही. मी तसाच माघारी फिरलो. चहा च्या टपरी वर आलो, एव्हाना चहा झालेला होता. चहा घेऊन रस्त्याच्या विरुद्ध बाजूला जाऊन त्या फूटपाथ वर पुन्हा मी चालू लागलो (अर्थात चहा पीत पीत).
मी इथून माघारी फिरून १० मिनिटे झाली असतील तिथेच मी पुन्हा पोचलो. एव्हाना एका माणसाने त्या झोपडीतल्या माणसाला पोहे आणून दिले होते. ते पोहे तो खात होता आणि त्या चिमुरडी ला पण खाऊ घालत होता. अचानक त्या माणसाचे लक्ष त्याच्या शेजारीच असलेल्या पिंपळाच्या बुंध्याशी गेले. त्याने तिथला लिंबू बघितला, तो भसकन उठला आणि काहीएक विचार न करता त्याने तो लिंबू उचलला. झोपडीत जाऊन सूरी आणली आणि त्याने तो कापून कचाकचा त्या पोह्यात पिळला. मला अक्षरशः तळपायापासून मस्तकापर्यंत सुरसुरी गेली.
ते दृश्य बघून आणि त्यांची लाचारी बघून मी पुन्हा माघारी फिरलो, यावेळी त्रासिक वाटत नव्हते तर स्वतःचा राग येत होता. मघाशी जो त्रासिकपणा मी दाखवला त्याचे दुःख वाटत होते. पुन्हा मी चहा टपरी वर आलो, अजून २ चहा गटकल्या. साधारण दीड तास मी तिथे चहा पीत वेळ घालवला असेल. तिथून माझ्या माघारी जायच्या वाटेवरच ती झोपडी होती. मी दुचाकीवर बसलो, आणि आता ते काय करत आहेत, हे बघण्यासाठी एकदम हळू हळू गाडी हाकत निघालो.
झोपडीजवळ पोचलो तेव्हा दृश्य अजून विदारक होते. माणसाने एव्हाना ती काळी डाळ धुवायला घेतलेली. चुलीवर एक काळपट भांडे ठेऊन त्याखाली जाळ सुरु झालेला होता. येड्या बाभळीच्या काटेरी काड्या त्याने चुलीत लावल्या होत्या. दुसऱ्या एका काळपट भांड्यात त्याने ती डाळ धुवून त्यातले गुलाल धुवून टाकले होते. एव्हाना मला अंदाज आलेला की आता हा माणूस नक्की ती मंतरलेली (किंवा कोणावरून तरी उतरून टाकलेली) काळी डाळ शिजवून खाणार आणि चिमुरडीला ही तेच खायला घालणार.
तिथून तसाच पुढे सरकलो. देवाचे १०० – १००० वेळा आभार मानले. आज आपल्यावर तरी अशी परिस्थिती नाही की असे रस्त्यावरचे मंतरलेले लिंबू आणि काळी डाळ आपल्याला खायला लागेल.
जीवनात तुम्ही किती चवडायक्या करता हे तुमची परिस्थिती आणि पोटात पेटलेला जाळ ठरवतो. मिळाले तर पंचपक्वान्न पण नको असते, नाही मिळाले तर उरकीरड्यात पडलेला भात सुद्धा आवडतो.