थोडे युट्यूब किंवा मोबाईल दाखवून खाऊ घाला

बाप झाल्यापासून एकच गोष्ट समजलीय की आपण जेव्हा आई – बाप नसतो तेव्हा इतरांना उपदेश देणे खूप सोपे असते. त्यात तुमचं मुल ओव्हर ऍक्टिव्ह किंवा हायपर ऍक्टिव्ह असेल तर त्याला सांभाळणे अधिक कठीण. माझा मुलगा लहानपणी हायपर ऍक्टिव्ह होता, आता जसा मोठा होतोय तसा तो नॉर्मल होतोय. हायपर ऍक्टिव्ह वरून तो आता ओव्हर ऍक्टिव्ह पर्यंत पोचलाय.

सतत पळत राहणे, खेळत राहणे, एका जागी न बसने यामुळे त्याचे बरेच तोटे झाले.

  1. स्वतः न जेवणे, भरवताना त्रास देणे.
  2. चावून खाण्यापेक्षा गिळण्या कडे कल असल्याने बोलायचे स्नायू डेव्हलोप न होणे, स्पष्ट उच्चार न येणे.
  3. एका जागी बसून समोरच्याचे बोलणे न ऐकल्याने उशिरा बोलायला सुरुवात.
  4. समोरचा काय सांगतोय याचे आकलन न होणे.

मुलाला उपाशी तर नाही ठेवू शकत, म्हणून त्याला वेळ प्रसंगी मोबाईल मध्ये काहीतरी दाखवून मग खाऊ घालायला लागले. मोबाईल बघताना खात असायचे बघून इतर लोक आम्हाला लगेच उपदेश द्यायचे. जुने लोक म्हणायचे आमच्या काळी असे लाड नव्हते. नवीन लोक म्हणायचे की आमचा “बाळ्या” असा नाही वैगरे.

आता या जुन्या लोकांना कसे सांगणार की तुमच्या काळी लोक खेड्यात राहायचे, एकत्र कुटुंब असायचे. लक्ष द्यायला रिकामचोट मंडळी खूप असायची. बैठी घरे असायची, खेळायला अंगण असायचे. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या पण दिवसातून १०च असायच्या. पोरं खेळत खेळत लांब गेली तरी हरकत नाही. गावाकडे लोक शेळीची हरवलेली पिल्ले पण घरी आणून सोडतात.

आता आम्ही मुंबई पुण्यात राहणाऱ्या लोकांना अनेक अडचणी असतात. घरे छोटी असतात, ती पण ५-६ व्या मजल्यावर, पोरांना खेळायला अंगण नाही. घरातून बाहेर पडले तर जिन्यात पडून किंवा लिफ्ट मध्ये अडकून पोरगं मरायची भीती (जरा स्पष्टच बोलले पाहिजे). इमारती वरून रस्त्यावर आले की मिनिटाला कमीत कमी ५० गाड्या जातात, त्यातून पोरांना सांभाळावे लागते. त्यात शहरात लहान मुले चोरीला जाण्याची भीती असते. हरवले तरी शहरात एवढ्या गर्दीत कोणी कोणाला ओळखत नाही.

थोडे युट्यूब किंवा मोबाइल दाखवून खाऊ घाला

तर विषय असा आहे की आम्ही घरी कधी कधी मुलाला फोन दाखवून जेवू घालतो. वेळ, जागा आणि माणसांच्या अभावी हे करावे लागते. आता आम्ही मुलाला शाळेत घातले. अडीच वर्षाच्या मुलाची काय शाळा? तर थोडक्यात प्ले ग्रुप. तिथे जाऊन तो २ तास मोकळ्या जागेत मनसोक्त खेळेल तरी. शिवाय मोबाईल वैगरे सारख्या गोष्टी पासून दूर राहील. नवीन तोंडे दिसतील आणि मन रमेल.

आज मुलाला घ्यायला गेलो. तिथे एक सुशिक्षित आई आपल्या बाळाला न्यायला आलेली. बाळ येतेय तो पर्यंत तिने आपल्या बाळा बद्दल तिथल्या शिक्षिकेला प्रश्न विचारायला सुरुवात केली.

आई: हा टिफिन खातो का?

शिक्षिका: नाही ना. खातच नाही. एकही घास खात नाही.

आई: थोडं यूट्यूब किंवा मोबाईल दाखवून खाऊ घाला त्याला.

शिक्षिका: (हसून) नाही, असे कसे आम्ही मोबाईल दाखवू शकतो. मोबाईल ची सवय सुटावी म्हणून कित्येक लोक इथे सोडतात पोरांना.

आई: मग तर तो खाणारच नाही. उपाशी राहील. थोडं जबरदस्तीने खाऊ घाला त्याला.

शिक्षिका: जबरदस्ती केली तर तो किंचाळतो, आणि आमच्या अंगावर धावून येतो. थोडे दिवस जाऊ द्या, इतरांना बघून बघून करेल तो.

आई: मग तो पर्यंत काय आमचा मुलगा उपाशी राहील?

अश्या आशयाचा एकूण एक तो संवाद होता. अरे ताई, तुमचा मुलगा खात नाही, त्याला मोबाईल ची वाईट सवय आहे. त्याची ती सवय सुटायला हवी ना. आणि २ तास आहे फक्त शाळा. २ तासात काय होते? तरी वाटत असेल तर २ घास खाऊ घालून त्याला शाळेत पाठवा. शाळेत १-२ घास तर खाईल तो. त्याला मोबाईल दिला तर इतर मुले सुद्धा मोबाईल बघतील. ज्यांना सवय आहे, त्यांची सुटणार नाही. ज्यांना सवय नाही, त्यांना ही घाण सवय लागेल.

तुमचा मुलगा बोलत नाही, त्याला काही समजत नाही

नातेवाईक, मित्र, इतर लोक आणि आता शाळेतल्या लोकांचे पण हे म्हणणे येते की मुलगा अजून बोलत नाही, त्याला सांगितलेले लवकर उमजत नाही वैगरे.

आधीच आमचा मुलगा हायपर ऍक्टिव्ह आहे, त्यात लहानपणापासून त्याला पूरक असे वातावरण मिळाले नाही. इथे शाळेत इतर पोरांमध्ये राहील, खेळेल, बोलेल. त्यांचे वागणे बोलणे बघेल तर तो त्यांचे अनुकरण करेल हा आमचा मुख्य मुद्दा आहे मुलाला शाळेत पाठवायचा.

या हायपर ऍक्टिव्हिटी चा फायदा एकच झाला जो की मोठा फायदा म्हणायला पाहिजे. तो म्हणजे बाळाची तब्येत. त्याच्या आजरी पडायचे प्रमाण इतर मुलांपेक्षा खूप कमी आहे. शिवाय कधी आजारी पडलाच तर लवकर रिकव्हरी होते. रडून रडून गोंधळ घालणे हे त्याच्या विश्वातच नाही.

Leave a comment