“गड्या आपला गाव बरा”.
हो, आहे ना गड्या आपला गाव बरा , पण असा गाव काय कामाचा, जिथे सतत रोजगाराची चिंता लागून राहील? असा गाव काय कामाचा, जिथे सतत जीवनावश्यक गोष्टी, जसे की डॉक्टरी इलाजाची कमतरता असेल? असा गाव काय कामाचा, जिथे तुम्हाला राहायला मोठे घर तर आहे, पण त्यात खायला काही नसेल? असा गाव काय कामाचा, जिथे गावात तुम्हाला सगळे ओळखतात, पण त्या ओळखीचा उपयोग रोजचा नमस्कार घेण्याशिवाय काहीच नाही.
लहान पणापासून च आपल्याला असे शिकवण्यात येते की आपला गाव च खरा असतो. गावात आपले नातेवाईक जवळ असतात, जे सुखदुःखात साथ देतात वैगरे. तसेच इतर लोक सुद्धा आपल्याला ओळखतात, त्यामुळे गावात कोणतीही कामे सहजपणे होतात.
जरी हे सगळे खरे असले तरी यावरून एवढेच लक्षात येते की माणसाने कधी महत्वाकांक्षी नसायला हवे. गावात येऊन जाऊन एकच व्यवसाय असतो, तो म्हणजे शेती. शेती सोडून दुसरा व्यवसाय नसतो. जर माणूस फक्त शेती करत राहिला असता तर सकाळी उठून काम करा, जेवा आणि झोप एवढेच काम मानवाचे राहिले असते.