“मराठी माणूस आणि त्याचे बंद पडणारे व्यवसाय” हे काय आपल्यासाठी नवीन नाही. जिथे राहतो तिथे दर एक दोन महिन्यात नवीन वडापाव, मिसळ, अमृततुल्य चे धंदे सुरु होतात. जंगी उदघाटन होते, मोठ्या लोकांना बोलावले जाते ज्यांचा राजकारणी संबंध असतो. नंतर २-३ महिन्यात ते दुकान बंद पडते.
मराठी माणसाचा वडापाव
मुंबईसकट अक्ख्या महाराष्ट्र च चालतं बोलतं स्नॅक्स म्हणजे वडापाव. दर २-३ महिन्यात आसपास च्या भागात एक तरी नवीन वडापाव सुरु होतो. एक घामेजलेल्या कारागिराला हाताशी धरून, मराठी माणूस रिकामा गल्ल्यावर बसतो. स्पर्धा असल्याने सुरुवातीला कोणी ग्राहक फिरकत नाही. ग्राहक आलेच तर त्याला तेच कधीतरी तळून ठेवलेले थंडगार वडे मिळतात. पाव सुद्धा कडक झालेले.
ग्राहकाने गरम द्या म्हणून मागणी केली की मालक भसकन काहीतरी बोलणार. एका माणसासाठी प्रत्येक वेळी एक एक वडा तळू की काय वैगरे भाष्य केले जाते. जेमतेम आलेला ग्राहक नंतर फिरकत नाही. माणसाचा पगार फुकट जातोय, दुकानाचे भाडे फुगतेय असे दिसताच दुकान बंद करायचा निर्णय घेतात. स्वतःला कष्ट नकोय. त्यात ग्राहक आलाच तर त्याला अरे तुरे ची भाषा.
मराठी माणसाची चहा (अमृततुल्य)
हल्ली एक ट्रेंड निघाला आहे. हाताशी पैसे असलेला मराठी माणूस एखाद्या अमृततुल्य ची franchise घेतो. तिथे चांगले furniture बनवून, बॅनर लावून जाहिरात होते. नंतर franchise कॅन्सल करून आपलाच चहा विकतात. तो पण नंतर परवडत नाही. त्यात काही महाभाग इंजिनीअर चहावाला, MBA चहावाला वैगरे बनतात. अरे दादा, तू जे शिकला त्याची तुला नोकरी मिळवता आली नाही अथवा टिकवता आली नाही. अशिक्षित लोक करू शकतात तो धंदा तू करायला घेतलाय आणि त्यात स्वतःला businessman समजतो.
तू शिकला त्या विषयाला धरून तू मोठा काहीतरी धंदा केला, दुकान टाकले तर आम्ही पण म्हणू की तू चांगले करतोय म्हणून. तू आहेस कॉम्पुटर इंजिनिअर आणि दुकान टाकतोय चहा चे. वरून माज टाटा, बिर्ला, अंबानी चा.
मराठी माणूस आणि अनेक नावाच्या पांचट मिसळी
तुम्ही १०० नावे द्या हो. पण मिसळ ती मिसळ. त्यात थोडे फार चीझ, बटर टाकले की नवीन नाव देतात. मिसळीची दुकान एकदम चकाचक बनवली जाते. सरपंच, आमदार असे काहीतरी नाव देऊन दुकानाचे मोठे बॅनर छापतात. उदघाटन मोठे करतात, जेणे करून परिसरात हवा होईल. मालक दिवसभर मिश्यांना ताव देत गल्ल्यावर बसतो. नोकर काम करतात. हळू हळू थोडे ग्राहक वाढले की आधीच मूठभर माज असलेला मालक अरे तुरे, हमरी तुमरी वर येतो. अगदी रिक्षावाल्यांची भाषा असते तशी वापरतात ग्राहकाला.
विशेष म्हणजे मिसळ खाणारा ग्राहक वर्ग मराठीच असतो. मराठी ग्राहकाला एकवेळ खायला माल एकदम रद्दी मिळाला तरी चालेल, पण दुकानात बसल्यावर त्याला फुल्ल इज्जत पाहिजे असते. हीच इज्जत ग्राहकाला देणे मराठी माणूस साफ विसरतो जेव्हा तो स्वतः मालक बनतो. मराठी माणसाला मानपान स्वीकारणे जमते, पण दुसऱ्या कुणाला मानपान देता येत नाही. सगळ्यांना तो आपल्यापेक्षा नीच समजतो.
इज्जत नाही मिळाली की आपोआप मराठी ग्राहक राजस्थान्याच्या किंवा गुजरात्यांच्या हॉटेलात जाऊन मिसळ खातो. अगदी रोजंदारी वर काम करणारा जरी ग्राहक आला तरी त्याला तिथे मानपान मिळतो. म्हणून त्यांचा धंदा चालतो आणि चांगला पैसा पण ते कमावतात. ग्राहक नाही बघून मराठी माणूस स्वतःचे आत्मपरीक्षण न करता धंदा बंद करायला घेतो. आज ३ महिन्यात सतत ३रा धंदा बंद पडलेला बघून आलोय. विशेष म्हणजे जिथे बंद पडलेय तिथे राजस्थानी माणसाने दुसरे दुकान उघडले आहे.
सरपंच वडापाव, उपसरपंच चहा, आणि रावसाहेब मिसळ नावाचे हे ३ धंदे होते. नाव मोठे, उदघाटन मोठे, हवा मोठी, पण जीभ हातात नाही म्हणून धंदा बुडाला. केलेले furniture वाया गेले, दुकानाचे भाडे निघाले नाही. कामगाराचा पगार फुकट गेला. शेवटी पैसे वाया गेले, धंदा चालला नाही असा शंख करत शटर लावून मराठी माणूस पुन्हा घरी बसला.
कोणताही धंदा जर टिकवायचा आणि वाढवायचा असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या जिभेवर ताबा. तो ताबा असला तर आलेला ग्राहक परत जात नाही. सुरु केलेला धंदा जर तुम्ही नेटाने १००० दिवस चालवला, अगदी एकही ग्राहक नसेल तरी सकाळी ७ पासून रात्री १० पर्यंत जर तुम्ही दुकानावर बसून राहिलात तर १००० दिवस होई पर्यंत दिवसाला तुम्ही नक्कीच मोठा गल्ला जमवाल अशी खात्री असते.
मी राहतो त्या भागात सतत मराठी माणसाचे धंदे सुरु होतात आणि बंद सुद्धा होतात. याच भागात नाही तर हे सगळीकडेच सुरु आहे. इथे उदाहरण म्हणून फक्त चहा, वडापाव आणि मिसळ चे सांगितले. इलेट्रीक चे दुकान, किराणा दुकान, वॉटर फिल्टर चे दुकान, जेवणाची मेस, xerox चे दुकान, पुस्तकांचे दुकान, कपड्यांचे दुकान, चप्पल – बुटांचे दुकान असे कितीतरी धंदे मराठी माणसाने इथे आसपास सुरु केले आणि ६ महिन्यांच्यात बंद झाले. दसरा दिवाळी ला उदघाटन आणि अक्षयतृतीये पर्यंत धंदा बंद.
आपलाच मराठी माणूस ग्राहक म्हणून आपली पायरी का चढत नसावा याचे आत्मपरीक्षण मराठी माणसाने केले पाहिजे.