पिढ्या ज्या असतात त्या अश्या एकदम झटक्यात बदलत नाहीत. आधीच्या पिढीतील २०% लोक नव्या पिढी प्रमाणे वागतात, वर्षे बदलतात तसे हे प्रमाण ८०% वर जाते, आणि शेवटी १००%. तो पर्यंत पुन्हा एक नवीन पिढी येऊ घातलेली असते. मग पुन्हा २०% – ८०%, हे चक्र असेच सुरू असते.
माझा एक मित्र आहे, वयाने माझ्यापेक्षा मोठा. त्याला सगळे काही करायचे असते, पण ते व्याजाच्या पैशांनी. त्याने फ्लॅट घेतला, सगळेच लोक कर्ज काढूनच फ्लॅट घेतात. याने पण कर्ज काढले. नॉर्मली लोक २० वर्षाची कर्जफेड घेतात. याने पगाराला परवडेल त्यापेक्षा कमीचा फ्लॅट घेतला पण कर्जफेड ३० वर्षाची ठेवली. का तर म्हणे हफ्ता कमी येईल आणि जवानी मधे आपल्याला इतर मौज मजा करायला पैसे राहतील, सगळे पैसे हफ्त्यात देऊन काय करायचे.
उधार की जिंदगी
मग अजून एक दोन वर्षात त्याने गाडी घेतली. झीरो डाऊन पेमेंट वर गाडी घेतली, ती पण कमी किमतीची आणि त्यावर १० वर्षाची कर्जफेड घेतली. हफ्ता कमी बसेल म्हणून. जेव्हा पासून गाडी घेतली आहे, तेव्हापासून हा कुठेही बस ने गेला नाही. कितीही लांब जायचे असुदे, हा त्या गाडीनेच गेला आहे. पेट्रोल सगळे क्रेडिट कार्ड ने भरायचे, आणि मग महिन्याच्या शेवटी मोठे बिल निघते.
तो दरवर्षी ५०-६० हजाराचे Personal Loan घेतो आणि फिरायला जातो. कपड्यांची खरेदी, खाणे पिणे, गाडी भाड्याचा अथवा पेट्रोल चा सगळा खर्च तो कर्जाच्या पैशांनी करतो, आणि मग वर्षभर हफ्ते भरतो.
दोन वर्षापूर्वी तो शिमला, कुलू मनाली ला गेला होता. मागच्या वर्षी दक्षिण भारत आणि यावर्षी आता राजस्थान ट्रीप ला गेलाय. त्याच्या आधी तो लडाख, वाघा बॉर्डर वैगरे जाऊन आलेल्याचे पण सांगत होता.
हा असा बिनकामी कर्जाऊ भपका मला तरी अजिबात आवडत नाही. तुम्हाला पण आवडत नसेल. नको त्या गोष्टी करायच्या, आणि मग हफ्त्यांच्या वजनाखाली दबलेले राहायचे. लाखभर पगार असलेल्या त्याला महिन्याला सगळे हफ्ते भरून शेवटी जेमतेम ५००० रुपये उरतात. कुणाला विश्वास नाही बसणार पण हे खरे आहे.
जन्माला आला हेला, पाणी भरून भरून मेला
एक कर्ज संपले नाही की हा लगेच दुसरे काहीतरी कर्ज घेऊन बसतो, आणि मग व्याज हफ्ते याच्या ट्रॅप मध्ये अडकून बसतो. ते Middle Class Trap वाले व्हिडिओ बहुतेक याच्या सारख्या लोकांकडे बघूनच बनवत असावेत.
आताची होऊ घातलेली ८०% पिढी अशीच आहे. यांच्या कडे Spotify, Netflix, Amazon Prime, Zee 5, Sony Liv, Alt Balaji अश्या सगळ्या कंपन्यांचे Subscription असते. त्याचे पैसे एवढे होतात की यांच्या एका महिन्याचे बिल हे पूर्ण वर्षभर केबल TV ला पुरेल.
पूर्वीच्या काळी लोक काटकसर करायचे. म्हणायचे की आपल्या पोरांना काही कमी नाही पडले पाहिजे. आपण उपाशी झोपलो, मजा नाही केली तरी चालेल. पण आताची पिढी “आज भेटतेय ना, उद्याचे उद्या बघू” या तत्वावर जगते आहे.