आपण राहतो तिथे आपल्या आसपास मंदिरे आणि इतर धर्मांची प्रार्थनास्थळे असतातच. धर्म द्वेष, अति मॉडर्निझम वैगरे मुळे कदाचित काही लोकांना या गोष्टी आपल्या आसपास नको असतात. नुकसान काय काय आहे यावर तर सगळ्यांनी आधी बोलून झालेय. आज या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून या गोष्टींचा आपल्याला कसा फायदा आहे ते मी माझ्या अनुभवानुसार इथे मांडतो.
आपण राहतो तो भाग जिथे घरे आहेत
आजकाल प्रत्येकाच्या घरी टीव्ही आणि २-४ मोबाइल फोन असतातच. लग्न आणि इतर मिरवणुकीत मोठे मोठे DJ असतात. त्यात बऱ्याच वेळा कर्णकर्कश आवाजात बीभत्स अशी गाणी लागतात. तरुणाई त्यावर नाचते. मंदिरात दिवसभर होणारा सौम्य घंटानाद मन प्रसन्न करत असतो. सकाळ संध्याकाळ होणारी आरती असते, त्यावेळी थोडा आवाज असतो, पण तो आवाज निश्चित आपल्या बीभत्स DJ पेक्षा कमी असतो. आणि जेमतेम १०-१५ मिनिटे ते सुरु असते. पुन्हा शांतता.
घराजवळ जेव्हा मंदिर असते, तेव्हा घरातील म्हातारी माणसे तिथे जाऊन बसतात. त्यांना थोडे बरे वाटते. घरात कोंडून रिकामे बसून चिडचिड करण्यापेक्षा ते बरे नाही का? मंदिराचा आवार थोडा मोठा असतो. तिथे एक सभामंडप असतो. घरातल्या १० बाय १५ च्या खोली पेक्षा निश्चित मोठी जागा असते. घरी लहान मुले असतील तर त्यांना खेळायला, थोडे पाय मोकळे करायला ती जागा होते.
प्रत्येक मंदिर एक तीर्थक्षेत्रच आहे.
मुंबई पुण्यासारख्या शहरात घरोघरी जाऊन सेवा देणारे, विक्रेते, सामान किंवा डबे पोचवणारे लोक अश्याच मंदिरात थोडा वेळ आराम करतात. त्यांना बसायची आणि जेवायची ही हक्काची जागा असते. पाण्याची सुद्धा सोय असते. तिथून बरेच लोक बाटलीत पाणी भरून पण नेतात.
माझ्या गावात असलेल्या मंदिरात मोठी लोक बसतात. गावातल्या बऱ्याच जमिनींचे सौदे याच मंदिरात झालेले आहेत.
आपण कामाला जातो तो परिसर
औद्योगिक भागात दिवसभर गर्मी आणि ऊन असते. म्हणावा तसा आसरा कुठेच नसतो. अश्या वेळी कामगारांना मंदिरे आणि प्रार्थनास्थळे म्हणजे वरदान असतात. ते तिथेच जाऊन जेवत असतात. जेवणाच्या सुट्टीत थोडी छाया, थोडी बसायला जागा, थोडे पाणी आणि जमलेच तर ५-१० मिनिटे पाठ टेकवायला पुरेसा आसरा. औद्योगिक भागात बरीच बाहेर गावची वाहने येत असतात. अश्या लोकांना ही हक्काची जागा असते. मंदिराला लागून बऱ्याच गोष्टी वाढतात. खाणे पिणे, पूजा साहित्य, वैगरे. थोडक्यात वर्दळ असते. म्हणून अश्या ठिकाणी थोडे सुरक्षित वाटते.
शाळा, कॉलेज आणि इतर संस्था
शाळेतल्या लहान मुलांना बीभत्स गोष्टींपेक्षा जर मंदिरातल्या आरत्या ऐकायला मिळाल्या तर त्यात गैर काय? देवाच्या भजनात वाईट मार्गाला लावणारे असे काहीच भाष्य नसते. शिवाय शिक्षणाची वेळ पाळूनच सगळ्या आरत्या वैगरे कार्यक्रम होत असतात. सकाळ संध्याकाळ मुलांना देवाचे दर्शन होते. आपापल्या धर्माच्या गोष्टी कळतात. वाईट मार्गाला जायच्या आधी ही रोजची अध्यात्मिक सवय नक्कीच त्या मुलांच्या मार्गात आडकाठी करते.
परीक्षा काळात बरेच लांबचे विद्यार्थी परीक्षेला येत असतात. खेड्यावरून शहरात येणारे बरेच विद्यार्थी असतात, जे सकाळी शिकवणी साठी लवकर येतात. शिकवणी संपली की शाळा कॉलेज सुरु व्हायला बराच अवकाश असतो. अश्यावेळी मंदिरं, प्रार्थनास्थळं म्हणजे यांच्यासाठी हक्काचा आसरा. मंदिरात झाडाच्या सावलीत अभ्यास करणे हे पूर्वापार चालत आले आहे. तेव्हा गुरुकुलात हे होत असे.
सुनसान रस्ते, महामार्ग परिसर
भारतात शेकडो मैलांचे सुनसान रस्ते आणि महामार्ग आहेत. बऱ्याच मार्गात रस्त्याच्या आतमध्ये गावे असतात. रस्ता मात्र सुना सुना असतो. अश्या वेळी जर महामार्गावर एखादे मंदिर असले तर ये – जा करणारी वाहने तिथे थांबून थोडा अवकाश घेऊ शकतात. आपण कितीही बोललो की वैज्ञानिक दृष्ट्या भुतांचे अस्तित्व नाही, तर मनात कुठेतरी बारीक भीती असतेच. अश्यावेळी मंदिरात थांबून एक प्रकारे सुरक्षेची अनुभूती होते. सुनसान रस्त्यावरून प्रवास करायला लोक घाबरत नाहीत.
शिवाय मंदिर असले तर त्याच्या आजूबाजूला थोडाफार तरी मानवी वास असतो, म्हणून तिथे दरोडा, चोऱ्यामाऱ्या ची पण भीती जरा कमी असते.
माझ्या आसपास च्या परिसरात जी मंदिरे आहेत, तिथे दररोज ऍमेझॉन फ्लिपकार्ट वाले जेवतात, त्यांची पार्सल सॉर्ट करून ठेवतात. फळविक्रेते, भाजी विक्रेते दुपारी तिथेच जेवतात. बरीच वयस्कर लोक सुख दुःखाच्या गप्पा तिथल्या सभामंडपात बसून करताना दिसतात.
त्याच मंदिराबाहेर एक आजीबाई बसते. जी डोक्याला टिळा लावते आणि त्या बदल्यात तिला दक्षिणेची अपेक्षा असते. ऑफिस ला जाणारा एक युवक थांबला, त्याने देवळात दर्शन घेतले. बाहेर बसलेल्या आजीबाईला विचारले, "जेवण झाले का?" आजीने नकारार्थी मान डोलावली. क्षणात त्याने आपल्या बॅगेतुन डबा काढला, आजीबाईच्या पुढे ठेवला. होय नाही म्हणत म्हातारी जेवली. जवळ असलेल्या बाटलीतून म्हातारीला पाणी दिले. तीच बाटली पुन्हा मंदिरातून भरून घेतली आणि आल्या मार्गाने तो निघून गेला.