पुण्या मुंबईचं सोडा पण गाव खेड्यातही अशा खूप मुली आहेत ज्या स्वतंत्र विचारांच्या आहेत त्यांना नाही लग्न करायचं. त्यांना नाहीत मुलं जन्माला घालायची. त्यांना फिरायचंय, त्यांना ट्रॅव्हलिंग करायचंय, त्यांना फोटो काढायचेत. त्यांना भारतातल्या लहानसहान गोष्टी जाणून घ्यायच्यायत. त्यांना मित्रांशी गप्पा मारायच्यायत. वाटेत येनाजाणाऱ्यांशी बोलायचंय हवं तेंव्हा कधीही कुठेही जायचंय. त्यांना पण गोव्याला फिरायला जायचंय.
गाव खेड्यात कसलं आलंय एक्सपोजर? पण तरीही ह्या पोरी सिनेमा पुस्तकं यातून जेवढं काही आपलं एक्सपोजर वाढवता येईल तेवढं वाढवण्याचा प्रयत्न करतायत. त्यांना लग्न केलच तर त्यांच्या जातीतल्या मुलासोबत नाही लग्न करायचं. लग्न केलंच तर मुलं जन्माला नाहीत घालायची. या पोरींना रिलेशनशिपमध्ये रहायचं आहे त्यांना लिव्ह इन मध्ये रहायचं आहे त्यांना सिनेमा ट्रॅव्हलिंग साहित्य यावर खूप गप्पा मारायच्या आहेत. त्यांच्या या आवडीचा आदर करणारा जोडीदार त्यांना हवा आहे. पण त्यांना ही अशी पोरं मिळणार कुठून?
गावात जर कोणी एखादा असलाच तर तो इतर जातीचा असतो किंवा नसतोच. आई वडील स्थळ तर असे शोधतात की त्यांच्या या सगळ्या स्वप्नांचा चुराडाच होईल. जी स्थळं येतात ती पुरुषसत्ताक पितृसत्ताक पद्धतीचा त्यांच्या पूर्ण परिवारावर खूप मोठा पगडा असतो. अशा मुलासोबत या पोरी लग्न करून काय करणार? अशा मुलासोबत लग्न झाल्यावर इच्छा नसताना मुलं जन्माला घालावी लागतात त्यांना सांभाळत बसावं लागतं सासू सासर्यांचे लाड करावे लागतात. जवळ पैसा नसल्याने काहीच करता येत नाही या पोरींना. या पोरींना अगोदर नोकरिला लागायचंय पुन्हा त्यांना हवातसा मुलगा शोधायचाय पण या पोरींच्या विचारांचा कसलाही विचार केला जात नाही या पोरींची लग्न लाऊन दिली जातात लग्नानंतर या पोरी पूर्ण कोमेजून जातात. लग्न केल्यामुळे मुलं जन्माला घालण्याने त्यांची उमेदीची वर्ष निघून जातात. त्यांच्या या उमेदीचा विचार कोणीही करत नाही.
एवढ्या कॉन्फिडन्ट पोरीची लग्नाने पाक वाट लावली.
एक पोरगी होती खूप धाडसी होती पोरांशी तर अशी बोलायची ना की राडाचं करायची. खूप जोरात हसायची. कायम टापटीप असायची. कॉलेजमध्ये असताना घरी असताना फक्त तिचाच दंगा असायचा. त्या एवढ्या मस्तीखोर पोरीचं लग्न केलं काही वर्षांनी तिला पाहिलं तर ती पोरगी एवढी साधी सरळ झाली होती की तिची कीव यायला लागली. तिचे ते विस्कटलेले केस ती वेडीवाकडी नेसलेली साडी सगळा ओंगळवाना अवतार बघून वाईट वाटायला लागलं. एवढ्या कॉन्फिडन्ट पोरीची लग्नाने पाक वाट लावली.
खरंतर या पोरींना खूप बोलायचंय त्यांना त्यांच्या मनातील खूप साऱ्या गोष्टी सांगायच्या आहेत पण त्यांना त्यांचं म्हणणं मांडायला प्लॅटफॉर्मच नाही. त्या हे सगळं कोणाजवळ बोलणार? या पोरींना खूप सिनेमे बघायचे आहेत. खूप ट्रॅव्हलिंग करायचं आहे आणि या सगळ्या अनुभवावर कोणाशीतरी बोलायचं आहे पण त्यांना साधं बोलायला सुद्धा कोण नाही. वय वाढत गेल्यावर त्यांना घरच्यांसमोर सरेंडर करावं लागतं. त्यांना नाईलाजाने लग्न करावं लागतं. त्यांच्या स्वप्नांना मारावं लागतं. त्यांना त्यांच्या विचारांना मारावं लागतं. वैचारिक आत्महत्या ही शारीरिक आत्महत्येपेक्षा वाईट असते. या पोरींना स्वतःला एक्सप्लोर करायला कसलंही साधन नाही. खूप मोठ्या घूसमटीमध्ये जगत आहेत या पोरी. आणि याची त्यांच्या घरातल्यांना शेजाऱ्यापाजाऱ्यांना कोणालाच खबर नाही.
माझे मत: स्वतंत्र जगायचे आहे तर त्यासाठी स्वतंत्र कमाईची आणि स्वतंत्र राहायची गरज असते. हे सगळं जर कोणाच्या जीवावर करत असाल तर साहजिक त्यांच्या अटीनुसार जगायला लागेल. आज परिस्थिती बरीच बदलली आहे. खेड्यातल्या पोरी उलट शहराच्या पोरींपेक्षा जास्त मॉडर्ननेस (वेस्टर्न) च्या दिवाण्या आहेत. आणि इतके सगळे जर ते करू शकतात तर स्वतंत्र कमाई आणि स्वतंत्र राहणे का नाही?
मधेच लेखकाने सांगितले आहे की या पोरींना व्यक्त व्हायचे आहे, पण त्यांना प्लॅटफॉर्म नाही. प्लॅटफॉर्म खूप आहेत. पूर्वी फक्त लिहिता यायचे, आता तर व्हिडिओ च्या माध्यमातून तुमचे म्हणणे जगभर पोचवता येते. शोकांतिका अशी की या अश्या प्लॅटफॉर्म चा वापर याच मुली फक्त त्यांचे नाचायचे व्हिडिओ टाकण्यात किंवा वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी वापर करतात. याच फेसबुक, इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्म मधून जगभर त्या पोरी आपले म्हणणे मांडू शकतात.
आजकाल स्मार्टफोन खेड्या खेड्यात पोचलाय. आणि जर पोचला नाही म्हणत असाल, तर लेखकाने सांगितल्या प्रमाणे अश्या इतक्या मागास मुलींना गोवा, जगात काय सुरुये, फॅशन काय, प्रेमविवाह याबद्दल माहिती असणे शक्य नाही किंवा असे विचार डोक्यात येणे शक्य नाही. माहिती असेल तर मग त्यांच्या कडे एकतरी स्मार्टफोन असावा. ज्यातून अनेक प्रकारे ते आपले म्हणणे मांडू शकतात.