वर्ष २००३
नवीन लग्न झालेल्या पोरीच्या नवऱ्याला धोंडे जेवण सांगायचे होते. बाई हातपाय चोळत होत्या. आपल्याकडे तर पैसा नाही, पोरगं अजून लहान आहे, काही कमवत नाही. धोंडे जेवण नाही केलं तर चार लोक तोंडात शेण घालतील. हो नाही म्हणत कार्यक्रम ठरला. फक्त जेवण आणि कमीत कमी किमतीचे कपडे घेतले गेले.
सासू (जावयाला) – आम्ही गरीब माणस, जेवढं झालं तेवढं देत आहोत.
जावई – अहो पण ह्याची काय गरज होती?
सासू – तुम्हाला गरज नव्हती हो, पण लोकांना दाखवायला लागते.
वर्ष २०२३
एव्हाना जावई हाताखाली आलेला. धोंडे जेवण चा महिना. मुलगा मोठा झालाय पण दारूच्या आहारी जाऊन घरीच बसला आहे. पण बाई नी हातपाय न चोळता पोरीला फोन केला, पोरिकडे २० हजार मागितले.
सासू (जावयाला): चांगले कपडे घालून या, आणि येताना तुमचा तो कॅमेरा घेऊन या. आणि जमले तर एखादा फोटोग्राफर घेऊन या.
जावई: हो.
सासूबाई आठवडाभर व्हॉट्सॲप ला पोस्ट करत आहेत, जावयाला २० हजाराच वाण लावल म्हणून.